top of page
website.jpg

जामखेडमध्ये अवैध सावकारीवर तीन ठिकाणी एकाच वेळी छापे


जामखेड प्रतिनिधी :23मे2026


जामखेड तालुक्यातील अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने एकाच वेळी तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत कोरे धनादेश, खरेदीखते, आर्थिक नोंदी असलेल्या वह्या तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


तालुक्यात अवैध सावकारी सुरू असल्याबाबत प्रशासनाकडे आवश्यक कागदपत्रांसह तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, विभागीय निबंधक संभाजी निकम आणि जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


सहायक निबंधक तथा सावकारांचे सहायक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश करून जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या समन्वयाने स्वतंत्र पथके तयार केली. त्यानंतर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-2014 च्या कलम 16 अन्वये ही कारवाई करण्यात आली.


सहकार विभागाचे 16 अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस दलाचे 6 अधिकारी अशा एकूण 22 जणांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी तीन संशयित ठिकाणांवर छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ उडाली.


छाप्यांदरम्यान कोरे धनादेश, खरेदीखते, आर्थिक नोंदी असलेल्या वह्या आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. या कागदपत्रांच्या आधारे पुढील तपास आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे.


सहकार विभागाने तालुक्यातील नागरिकांनी अवैध सावकारीविरोधात जामखेड येथील सहायक निबंधक कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह तक्रार दाखल केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सध्या जप्त कागदपत्रांची पडताळणी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.


 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page