“जन्मदाखल्यासाठी ३ हजार रुपयांची लाच!” – जामखेड नगरपरिषद हादरली, लिपिक–मदतनीस रंगेहात लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
- Police Warrant
- May 6
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/6 मे 2026
जामखेड नगरपरिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून, जन्मदाखला तयार करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषद कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जामखेड नगरपरिषदेचे जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील लिपिक अभिजीत जालिम भैसडे (वय ३९) व अग्निशामक दलातील कंत्राटी मदतनीस अहमद इलियास शेख (वय ४३) यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तक्रारदार यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या मुलगा-मुलीचा जन्मदाखला काढण्यासाठी नगरपरिषदेत अर्ज केला होता.
त्यानंतर त्यांना भैसडे यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले होते.तपासात असे समोर आले की, अहमद शेख यांनी प्रत्येक दाखल्यासाठी १५०० रुपये याप्रमाणे दोन दाखल्यांसाठी एकूण ३ हजार रुपयांची लाच मागितली होती.
५ मे २०२६ रोजी या लाचेची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. ६ मे रोजी पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी सत्य असल्याचे निष्पन्न झाले आणि जामखेड नगरपरिषदेसमोर रंगेहात सापळा रचण्यात आला.
पंचासमक्ष होणाऱ्या या ऑपरेशनमध्ये अहमद शेख यांनी तक्रारदाराकडून ३ हजार रुपये स्वीकारताना पकडले गेले. तपासात अभिजीत भैसडे यांनीही लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम ७अ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांनी केले असून, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली कार्यपथकातील चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ व चालक दशरथ लाड यांनी सहभाग घेतला. भारत तांगडे पोलीस अधीक्षक, माधव रेड्डी व सुनिल दोरगे या अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, भ्रष्टाचाराच्या काहीही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही. सेंटर समोर, सावेढी, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




Comments