top of page
website.jpg

जामखेडमध्ये रोजगाराची मोठी संधी; पुण्यातील ल्युमॅक्स इंडस्ट्रीजची मेगा भरती, जागेवरच होणार निवड



जामखेड (प्रतिनिधी) : १० मे २०२६

पुणे येथील चाकण औद्योगिक परिसरातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी लुमॅक्स इंडस्ट्रीज यांच्या वतीने जामखेड शहरात दि. १२ रोजी भव्य रोजगार मेळावा व वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार असून, पात्र उमेदवारांची जागेवरच मुलाखत घेऊन थेट निवड करण्यात येणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर तसेच उद्योजक व कुसडगावचे माजी सरपंच बापूसाहेब कार्ले यांच्या पुढाकारातून हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना नोकरीसाठी पुण्यात जाऊन पायपीट करावी लागू नये, यासाठी कंपनीची भरती प्रक्रिया थेट जामखेडमध्ये आणण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले.


पंचायत समितीसमोरील जामखेड सेंट्रल कॉम्प्लेक्स मधील बी.के. शिंदे महाविद्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुलाखती होणार आहेत. कंपनीला मोठ्या प्रमाणावर कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने तालुक्यातील शेकडो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या भरती प्रक्रियेसाठी १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय (ITI), कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच बी.ई. व डिप्लोमा धारक उमेदवार पात्र असणार आहेत. बी.ई. व डिप्लोमा धारकांची नियुक्ती “डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी (DET)” म्हणून करण्यात येणार असून इतर पात्र उमेदवारांना “असोसिएट ट्रेनी” म्हणून संधी दिली जाणार आहे.


डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी पदासाठी पहिल्या वर्षी ₹२४,४३८, दुसऱ्या वर्षी ₹२६,५६६ आणि तिसऱ्या वर्षी ₹२८,५६८ इतके वेतन देण्यात येणार आहे. तसेच असोसिएट ट्रेनी पदासाठी ₹२२,२८१ ते ₹२४,४३८ इतके स्टायपेंड मिळणार आहे. सर्व पदांसाठी १२ तासांची शिफ्ट असणार आहे.


कंपनीकडून कर्मचाऱ्यांना मोफत कॅन्टीन तसेच मोफत बस सुविधा देण्यात येणार आहे. भोसरी, चाकण, मोशी, आळंदी, देहू, वासुली, आंबेठाण, खालुंब्रे, बिरदवाडी आणि सावरदरी या मार्गांवर बस सुविधा उपलब्ध असणार आहे.


मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो तसेच सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात येणार असून, त्यांना पुणे येथे कंपनीत रुजू होण्यासाठी तातडीने बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


“तालुक्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,” असे आवाहन विजयसिंह गोलेकर व बापूसाहेब कार्ले यांनी केले आहे. ही बातमी गरजवंत बेरोजगार तरुणांपर्यंत जाण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करून आपले बेरोजगार नातेवाईक, मित्र यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page