तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच 12 तासांत आरोपी ताब्यात
- Police Warrant
- May 22
- 1 min read

अहिल्यानगर प्रतिनिधी/22मे 2026
तरुणीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत जेरबंद केले आहे. आरोपीचे नाव बंटी उर्फ संकेत ससाणे, रा. सिद्धार्थनगर, अहिल्यानगर असे आहे.
ही घटना 20/05/2026 रोजी रात्री 09.00 ते 11.00 वाजेच्या सुमारास घडली. पीडिता मैत्रिणीला भेटून ऍक्टिवा गाडीवरून घरी परतत असताना व्ही स्टार हॉटेलसमोरील रोडवर एका अनोळखी इसमाने मोटारसायकलवरून पाठलाग केला. त्याने हातवारे करून व बोलून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेदरम्यान पीडितेने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करत, व्हिडीओतील इसमाला ओळखत असल्यास नाव कळवावे, असा संदेशही तिने प्रसारित केला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला. शहरातील माहिती, गुप्त बातमीदार आणि तपासकौशल्याच्या आधारे आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या इसमाविरुद्ध आणखी एक तक्रार प्राप्त झाल्याने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 377, 378/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78, 79 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याकडे हजर करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे "झिरो टॉलरन्स" धोरण असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, अशा घटनांची माहिती नागरिकांनी तत्काळ 112 वर द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.




Comments