मोहरी तलाव दुरुस्तीचा महत्वाचा मुद्दा ऐरणीवर; आ.रोहित पवार यांच्या कडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
- DIGITAL FLY
- 5 minutes ago
- 2 min read

मोहरी तलाव दुरुस्तीचा महत्वाचा मुद्दा ऐरणीवर; आ.रोहित पवार यांच्या कडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना
खर्डा प्रतिनिधी/7एप्रिल2026
जामखेड तालुक्याचा जीवनदायी ठरलेला मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्प सध्या गंभीर अवस्थेत असताना आमदार रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी ठोस पुढाकार घेत हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
खर्डा सारख्या मोठ्या गावांसह तब्बल दहा गावांचा पाणीपुरवठा या तलावावर अवलंबून असून, दुष्काळात संपूर्ण तालुक्याची तहान भागवणारा हा प्रमुख स्रोत आहे. बालाघाटाच्या डोंगररांगांनी वेढलेल्या या प्रकल्पामुळे कमी पावसातही पाणी साठते व तेलंगशी, जायभायवाडी तसेच मोहरी, खर्डा, गवळवाडी परिसरातील शेतीला मोठा आधार मिळतो.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे तलावाच्या मुख्य भरावाची भिंत वाहून गेल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः मशीनरी व जेसीबीच्या साहाय्याने भगदाड बुजवण्याचे काम सुरू केले होते. मात्र, तांत्रिक कारणे पुढे करत येथे भेट देणाऱ्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. कर्जत जामखेड मतदारसंघात विविध कामांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असून या जिव्हाळ्याच्या कामाचे श्रेय आमदार रोहित पवार यांना जाण्याच्या भितीने सत्ताधाऱ्यांनी हे सुरू असलेले काम त्यावेळी थांबवले आणि नंतर त्याकडे दुर्लक्ष केले. स्वतः काही करायचे नाही आणि दुसरा कोणी करत असेल तर त्यामध्ये खोडा घालण्याची सत्ताधाऱ्यांची वृत्ती मतदारसंघाच्या विकासासाठी बाधक ठरत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात घेऊन विजयसिंह गोलेकर यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन देत प्रश्न मांडला. यावर तातडीने प्रतिसाद देत आमदार पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्वरित कार्यवाहीची मागणी केली. तसेच या संदर्भात अधिकृत पत्रही देण्यात आले आहे.
सध्या एप्रिल महिना सुरू असूनही कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास पहिल्याच पावसात भराव वाहून जाऊन खर्डा परिसरातील अनेक गावांना पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी मोहरी तलाव हाच एकमेव आधार असल्याचा इतिहास आहे. खैरी मध्यम प्रकल्पासारखे मोठे तलाव कमी पावसात भरत नसल्याने मोहरी तलावाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
तसेच नायगाव प्रकल्पालाही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून त्यासाठीही तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
विजयसिंह गोलेकर यांच्या पाठपुराव्याला आमदार रोहित पवार यांची तात्काळ साथ; आता प्रशासनाने त्वरित कृती करणे गरजेचे!
अन्यथा, जामखेड तालुक्याला पूर आणि दुष्काळ या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर पाटील, वैभव जमकावळे, श्रीकांत लोखंडे, खर्डा सोसायटीचे चेअरमन सुहास गोलेकर पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष गणेश ढगे, ओंकार इंगळे, बाबु गटकळ हे उपस्थित होते.




Comments