द ग्रेट खलींच्या भव्य रॅलीने अहिल्यानगर प्रचारात धुमाकूळ! भाजप-राष्ट्रवादीला 'खली' पाठिंबा
- Police warrant
- 3 days ago
- 2 min read

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : 13 जानेवारी 2026
अहिल्यानगर शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांच्या आगमनामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले. सकाळी ११ वाजता नगरमध्ये दाखल झाल्यानंतर खली यांनी सर्वप्रथम विशाल गणपतीचे दर्शन घेतले.
गणपती मंदिर ते दिल्ली गेटपर्यंत भव्य रॅली
गणपती दर्शनानंतर गणपती मंदिर ते दिल्ली गेट या मार्गावर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान द ग्रेट खली यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या साध्या आणि प्रेरणादायी शब्दांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी बोलताना द ग्रेट खली यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सध्या अहिल्यानगर शहराची हवा ही भाजप–राष्ट्रवादी युतीच्या बाजूने एकतर्फी दिसून येत आहे, असे मत व्यक्त करत त्यांनी नगरच्या पाणी, रस्ते, रोजगार व विकासाशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी भाजप–राष्ट्रवादी युतीला मतदान करण्याचे थेट आवाहन खली यांनी केले. सक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख विचारांच्या जोरावर शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी द ग्रेट खली यांनी युवकांना उद्देशून नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. युवक शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिले तर देशही सक्षम होईल. भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर आरोग्य आणि शिस्त या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच नगर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप–राष्ट्रवादी युतीला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष कौतुक
खली यांनी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यशैलीचे खुलेपणाने कौतुक केले. “शहराच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका असून विकासासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामातून सकारात्मक बदल दिसून येतो, म्हणूनच आज या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
नगरमधील प्रचाराला नवी दिशा
द ग्रेट खली यांच्या उपस्थितीमुळे नगरमधील प्रचाराला नवी दिशा मिळाली असून, आगामी निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी युतीला याचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.या रॅलीत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यासह भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.











Comments