मोहरी धरणावर सुरक्षा समिती येणार म्हणून प्रशासनाची धावपळ - घाईघाईत मान्सून पूर्व तपासणी! पहा डिटेल्स
- Police Warrant
- 6 days ago
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/11एप्रिल2026
मोहरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या गंभीर झालेल्या अवस्थेकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यानंतर आता प्रशासनाची धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर येत्या सोमवार, दि. १३ एप्रिल रोजी धरण सुरक्षा आढावा समिती मोहरी येथे प्रत्यक्ष पाहणीसाठी येणार असल्याची माहिती समोर येताच, स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज कुकडी पाटबंधारे विभाग, प्रकल्प क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता प्रविण घोरपडे यांनी मोहरी धरणाची मान्सूनपूर्व पाहणी घाईघाईत उरकून घेतल्याचे समोर आले आहे. समितीच्या समोर उत्तरे द्यावी लागतील म्हणून आज कार्यकारी अभियंता श्री.घोरपडे यांनी सकाळी लवकर सुरुवात करत रत्नापूर, नायगाव, तेलंगशी व त्यानंतर मोहरी प्रकल्पाची मान्सून पूर्व पाहणी केली. त्यानंतरही त्यांनी खैरी मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील इतर धरणांची पाहणी केल्याचे समजते.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे धरणाच्या भरावाला व सांडव्याला मोठे नुकसान होऊन भिंतीत भगदाड पडले होते. या घटनेनंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली; मात्र कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नव्हती.
नियमानुसार धरणांची सुरक्षा तपासणी वर्षातून किमान दोन वेळा – मान्सूनपूर्व व मान्सूननंतर – करणे बंधनकारक असताना, मोहरी धरणाच्या बाबतीत ही प्रक्रिया वेळेत पार पडली नसल्याचे स्पष्ट होत आहे. पूरस्थितीनंतर विशेष तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
धरण सुरक्षा आढावा समिती ही उच्चस्तरीय तांत्रिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेली यंत्रणा असून राज्यातील धरणांच्या सुरक्षेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. या समितीकडून धरणाची सद्यस्थिती, धोका स्तर, आवश्यक दुरुस्ती कामे व आपत्कालीन उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, आज झालेल्या पाहणीवेळी स्थानिक राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. “इतका गंभीर प्रश्न असताना प्रशासनाने वेळेत दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
मोहरी धरणावर जामखेड तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा व शेती अवलंबून असल्याने या प्रकल्पाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. दुरुस्तीला विलंब झाल्यास पावसाळ्यात पूराचा धोका तर दुष्काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सोमवारी समितीच्या पाहणीनंतर प्रशासन खरोखरच ठोस पावले उचलते की केवळ कागदी घोडे नाचवले जातात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, नवनाथ गोपाळघरे, राष्ट्रवादी युवक चे कार्याध्यक्ष रामहरी गोपाळघरे, महालिंग कोरे, भागवत सुरवसे, प्रशांत कांबळे, नानासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, बाबासाहेब होडशीळ, बाळासाहेब गोपाळघरे, हनुमंत हजारे, भरत आहेर, पांडुरंग गिते, दिगांबर होडशीळ आदी उपस्थित होते.



Comments