जनकल्याण महामार्गाला गती! कल्याण-लातूर मार्ग सहा जिल्ह्यांतून; जामखेडसह मराठवाड्याला जोडणी
- Police warrant
- Dec 28, 2025
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/28 डिसेंबर2025
लातूरकडे जलदगतीने पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एमएसआरडीसीच्या ४ हजार किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांतर्गत हा महामार्ग प्रस्तावित होता, मात्र अनेक वर्षे तो कागदावरच अडकला होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाचे सादरीकरण पाहिल्यानंतर तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्यांनी प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आणि विधानसभेत अधिकृत घोषणा करून अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला. मराठवाडा, विशेषत: लातूरच्या विकासासाठी 'जनकल्याण महामार्ग' हे नाव देण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने सल्लागारांच्या मदतीने संरेखन कार्याला सुरुवात केली आहे. संरेखन पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागतील, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग सहा जिल्ह्यांतून जाणार आहे.संरेखनाची संभाव्य मार्गसूचीपूर्वीच्या अंदाजानुसार हा महामार्ग कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसूंबा आणि अंबेजोगाईमार्गे लातूर आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाणार होता. मात्र आता स्पष्ट झालेल्या संरेखनानुसार मार्ग असा असेल:उल्हासनगर (ठाणे जिल्हा)मुरबाड (ठाणे)जुन्नर (पुणे)अहिल्यानगर (अहिल्यानगर)आष्टी (अहिल्यानगर)पाटोदा (बीड)बीड (बीड)केज (बीड)कळंब (धाराशीव)लातूर (लातूर)औसा (लातूर)निलंगा (लातूर)या संरेखनामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांना जोडणी मिळेल. यामुळे या जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांना महामार्गाची सुविधा उपलब्ध होईल. संरेखन अंतिम झाल्यानंतरच पूर्ण स्पष्टता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेल्या या महामार्गाबाबत स्थानिक राजकीय नेते सक्रिय झाले आहेत. धाराशीवचे पालकमंत्री व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा महामार्ग लातूर, कळंब, पारा, ईट, खर्डा, जामखेड, अहिल्यानगर आणि कल्याणपर्यंत नेण्याची मागणी केली आहे. जामखेडसारख्या तालुक्यांना जोडण्यावर त्यांनी भर दिला आहे.
दुसरीकडे, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला वगळून महामार्ग नेण्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. बीडमधूनच हा महामार्ग जावा, अन्यथा जनतेत असंतोष वाढेल असा इशाराही त्यांनी दिला. आपापल्या जिल्ह्यातून महामार्ग जावा यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असले तरी एमएसआरडीसीने स्पष्ट केले की, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या योग्य असलेले संरेखनच अंतिम होईल. सूत्रांनुसार बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून मार्ग जाणार आहे.या महामार्गामुळे कल्याण ते लातूरचा प्रवास लक्षणीयरीत्या कमी वेळेत होईल आणि मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. संरेखनाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे











Comments