जामखेडमध्ये मध्यरात्री दहशत हॉटेलवर गोळीबार: मालक रोहित पवार गंभीर जखमी, एक आरोपी ताब्यात; चार नावे निष्पन्न
- Police warrant
- 2 days ago
- 1 min read

जामखेड, दि. १८ डिसेंबर:
जामखेड-बीड रोडवरील हॉटेल कावेरीवर गुरुवारी (१८ डिसेंबर) मध्यरात्री दहा ते अकरा संशयितांच्या टोळीने थरारक हल्ला करून परिसर हादरवला. प्रथम तोडफोड करून अंदाधुंद गोळीबार केल्याने हॉटेल मालक रोहित अनिल पवार (२७, रा. कान्होपात्रा नगर, जामखेड) हे गंभीर जखमी झाले. पायात गोळी लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक आहे.रोहित पवार यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(५), ३५१(२)(३) आणि शस्त्र कायदा कलम ३, २५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला. नाव निष्पन्न झालेले आरोपी:
१. शुभम शहाराम लोखंडे (रा. आष्टी, ता. आष्टी, जि. बीड)
२. उल्हास विलास माने उर्फ वस्ताद (रा. जांबवाडी रोड, जामखेड)
३. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (रा. भवरवाडी, जामखेड)
४. अर्शद अमीन सय्यद (रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड)
यातील एक आरोपी नामे उल्हास विलास माने उर्फ वस्ताद रा.जांबवाडी रोड जामखेड पोलीसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित सहा-सात संशयितांचा शोध सुरू आहे.
मध्यरात्री १२ ते १२.१५ दरम्यान रोहित पवार हॉटेलसमोर उभे असताना टोळी धडकली. टेबल, खुर्च्या, भांडी तोडत हल्ला केला आणि रोहित यांच्यावर गोळीबार केला. त्यांची चारचाकी गाडीही फोडली गेली. कर्मचारी घाबरून पळून गेले. जुना वाद किंवा वैयक्तिक शत्रुत्व कारणीभूत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार जबानी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने चार आरोपींची ओळख पटली. घटनास्थळी गावठी कट्ट्याचे अवशेष सापडले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय अधिकारी प्रविणचंद लोखंडे आणि पीएआय दशरथ चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
या घटनेमुळे जामखेड-बीड रोड परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे.











Comments