लातूर–कल्याण जनकल्याण महामार्ग जामखेड तालुक्यातून सरळ मार्गे जावा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांची मागणी
- Police warrant
- 2 days ago
- 2 min read

जामखेड | प्रतिनिधी १९ डिसेंबर२०२५
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण–लातूर द्रुतगती जनकल्याण महामार्गाला तत्वतः मंजुरी दिली असून, हा महामार्ग सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा असणार आहे. या महामार्गामुळे लातूर ते कल्याण हे सध्याचे १०–११ तासांचे अंतर अवघ्या ४–५ तासांत पूर्ण होणार आहे.
राज्य मार्ग विकास महामंडळामार्फत या महामार्गाचा डीपीआर (सविस्तर आराखडा) तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नागपूर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यास मंजुरी दिली आहे. भूसंपादन व निधीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी या महामार्गाचा सरळ मार्ग जामखेड तालुक्यातूनच घेण्यात यावा, अशी ठाम आणि जनहिताची मागणी केली आहे.

सध्याच्या प्राथमिक आराखड्यात हा सहा पदरी महामार्ग वाकडा-तिकडा वळवण्यात येत असल्याने लातूर–कळंब–इटकूर–पारा–पारगाव–ईट–खर्डा–जामखेड–आष्टी–कडा–अहिल्यानगर या पट्ट्यातील अनेक गावे विकासापासून वंचित राहणार असल्याचे गोलेकर यांनी स्पष्ट केले.
जर हा महामार्ग सरळ मार्गे जामखेड तालुक्यातून गेला, तर या संपूर्ण परिसराला राष्ट्रीय महामार्गाचा थेट लाभ मिळेल. यामुळे व्यापार व उद्योगांना चालना, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, वाहतूक खर्चात बचत तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हा जनकल्याण महामार्ग सध्याच्या आराखड्यानुसार अहिल्यानगर, बीड, अंबाजोगाईमार्गे लातूरकडे जाणार असून पुढे कर्नाटक सीमेपर्यंत विस्ताराची शक्यता आहे. शक्तिपीठ महामार्गाप्रमाणे मराठवाड्याच्या विकासाचा दावा केला जात असताना, अंतर वाढवणारा वाकडा मार्ग नेमका कोणाच्या हिताचा आहे? असा सवालही विजयसिंह गोलेकर यांनी उपस्थित केला आहे. नकाशामध्ये पाहिल्यास ह्या मार्गाशी केलेली छेडछाड तात्काळ लक्षात येते असेही ते म्हणाले.
संघर्ष समिती स्थापन करण्याची मागणी;
या महत्त्वाच्या मागणीसाठी तात्काळ संघर्ष समिती स्थापन करून नियोजित लढा उभारणे आवश्यक असल्याचे गोलेकर यांनी सांगितले.ही समिती अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके आणि
कर्जत–जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
“वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करून उपयोग नाही. हा शेवटचा निर्णायक टप्पा आहे. सर्वांनी एकत्र येऊन जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवावा,” असे आवाहन करत गोलेकर यांनी स्पष्ट इशारा दिला.











Comments