ह.भ.प. राजेंद्र महाराज लोखंडे यांना गंगाई–बाबाजी समाजभूषण पुरस्कार
- Police warrant
- Jan 1
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/1 जानेवारी2026
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील मूळ रहिवासी, समाजातील अध्यात्मिक, धार्मिक व तर्कशास्त्रीय क्षेत्रात आगळेवेगळे व समाजोपयोगी कार्य करणारे ह.भ.प. राजेंद्र महाराज लोखंडे यांची गंगाई–बाबाजी समाजभूषण पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. गंगाई–बाबाजी पुरस्कार संयोजन समितीच्या वतीने ही निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राजेंद्र महाराज लोखंडे यांचे प्राथमिक शिक्षण दिघोळ (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. शालेय जीवनापासूनच अध्यात्माची ओढ असलेल्या महाराजांनी पुढे एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी खेमानंद महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले. काही काळ वैराग्यमूर्ती ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या संस्थेत सेवा केल्यानंतर त्यांनी संपूर्णतः अध्यात्मिक साधनेला स्वतःला वाहून घेतले.
ब्रह्मचारी वृत्तीने जीवन जगत असताना राजेंद्र महाराजांनी तारखेच्या तर्कशास्त्रावर आधारित विलक्षण ज्ञान आत्मसात केले. कोणताही ज्योतिषशास्त्राचा औपचारिक अभ्यास न करता केवळ तर्कशक्तीच्या आधारे व्यक्तीची जन्मतारीख, वार तसेच जीवनातील संभाव्य घटना अचूकपणे सांगण्याची अद्भुत क्षमता त्यांनी विकसित केली आहे. त्यांच्या अनेक भाकितांचा अनुभव आजवर खरा ठरला असून राज्य व जिल्हा पातळीवरील अनेक राजकीय व सामाजिक अंदाज चर्चेचा विषय ठरले आहेत.
विशेष म्हणजे नैराश्यात सापडलेल्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील येणाऱ्या सकारात्मक क्षणांची जाणीव करून देत आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांपासून परावृत्त करण्याचे मोलाचे समाजकार्य महाराज सातत्याने करत आहेत. तसेच सामाजिक, अध्यात्मिक व पर्यावरण विषयक जनजागृतीचे कार्य ते अहोरात्र करीत आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गंगाई–बाबाजी समाजभूषण पुरस्कार २०२५ आज त्यांना प्रदान करण्यात येत आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून ह.भ.प. राजेंद्र महाराज लोखंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे











Comments