Dysp संतोष खाडे यांची बदली होताच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण… जामखेडमध्ये अवैध धंद्याना उधाण
- Police warrant
- Oct 25
- 2 min read

श्वेता गायकवाड | जामखेड
जामखेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (DySP) संतोष खाड़े यांची बदली झाल्यानंतर तालुक्यात बंद पडलेले अवैध धंदे पुन्हा जोमात सुरू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
खाड़े यांच्या कार्यकाळात जामखेड तालुक्यातील अनेक अवैध हॉटेल्स, गुटखा, मटका, जुगार, देशी-विदेशी दारू विक्री व वाळू चोरीवर जोरदार कारवाई करण्यात आली होती. 28 जून 2025 रोजी त्यांच्या विशेष पथकाने नगर रोडवरील हॉटेल पाटील वाडा आणि खर्डा रोडवरील हॉटेल साई लॉजिंग येथे छापा टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.
त्याच दिवशी हॉटेल साहेबा, हॉटेल तांबे, हॉटेल कावेरी, हॉटेल नॅशनल आणि हॉटेल आदित्य या पाच ठिकाणी छापे टाकून सुमारे 1.2 लाख रुपयांची अनधिकृत दारू हस्तगत करण्यात आली होती. यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी 3 आरोपींना यापूर्वीच म्हणजे 18 जून रोजी अटक करण्यात आली होती.
मात्र, DySP संतोष खाड़े यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या सर्वच ठिकाणी पुन्हा अवैध व्यवहार सुरू झाल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. पुन्हा एकदा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झाली आहे. पोलिस कारवाईमुळे बंद झालेली हॉटेल्स व अवैध धंद्यांची दुकाने नव्याने खुली झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
या घडामोडींमुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये नाराजी आणि असुरक्षिततेची भावना वाढली असून, जनतेतून पुन्हा एकदा दबंग व निर्भीड अधिकाऱ्याची गरज व्यक्त होत आहे.
जामखेडकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे.
कोट
जामखेड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री नागेश्वर देवस्थानची नागपंचमी यात्रा दिनांक 29 जुलै रोजी सुरू होणार आहे. या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही नगर, मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून हजारोंच्या संख्येने भाविक, विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणात जामखेडमध्ये दाखल होतो.
या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत आवश्यक आहे. यात्रेच्या कालावधीत अवैध धंदे, हॉटेल्समध्ये बेकायदेशीर दारूविक्री, जुगार व इतर गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक जनतेची मागणी आहे.
कारण यापूर्वीच्या वर्षांत नागपंचमी यात्रा काळात काही हॉटेल्समध्ये वाद-विवाद, दारूधुंद स्थितीतील राडे आणि महिलांबाबत असभ्य वर्तनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे यंदा अशा प्रकारांना आळा बसावा आणि संपूर्ण यात्रोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा जनेतेमधून केली जात आहे.











Comments