अंगलट आले की मी ‘नाही त्यातली अन् कडी ….. आतली’ म्हणण्याची भाजपला सवय संदिप गायकवाड भाजपाचा असल्याचे एक नाही तर हजार पुरावे - विजयसिंह गोलेकर
- Police warrant
- Dec 6
- 2 min read

जामखेड, ता. ६ –डिसेंबर
नृत्यांगना दिपाली पाटील हिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलिसांनी अटक केलेला आरोपी माजी नगरसेवक संदिप गायकवाड हा भाजपचाच असून याचे एक नाही तर हजार पुरावे उपलब्ध आहेत. परंतु अंगलट आले की दुसऱ्यावर ढकलायचं आणि स्वतः मात्र ‘मी नाही त्यातली अन् कडी … आतली’ अशी भूमिका घ्यायची ही भाजपाची वृत्ती असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संदिप गायकवाड हा भाजपचाच असल्याचे अनेक फोटोही उघड केले.
जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील हिने गुरुवारी साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आईच्या फिर्यादीनुसार माजी नगरसेवक संदिप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी याबाबत आवाज उठवून राजकीय दबाव सहन न करता आरोपीवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर २४ तासांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली. तसेच संबंधित आरोपी हा भाजपाशी संबंधित असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. त्यावर जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी संबंधित आरोपीचा भाजपाशी काही संबंध नाही तर तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकता असल्याचे म्हटले होते, तर संबंधित आरोपी संदिप गायकवाड हा भाजपाचाच असल्याचे एक नाही तर हजार पुरावे असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी कार्ले यांच्यावर पलटवार केला. आरोपी संदिप गायकवाड याची पत्नी भाजपाची उमेदवार असून तिचा जाहीर प्रचार संदिप गायकवाड करत होता. तसेच एका रॅलीमध्ये गुंड निलेश घायवळ आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाया पडत असल्याचा व्हिडिओही त्यांनी जाहीर केला. याशिवाय गायकवाड हा भाजपाचाच कार्यकर्ता असल्याचे सांगत पक्षाचे सोशल मिडियातील अनेक फोटोही दाखवले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गायकवाड याने भाजपाचा जाहीर प्रचार करुनही भाजपा हा आता त्याला आपला नसल्याचे म्हणत असेल तर भाजप हा कार्यकर्त्यांसाठी ‘वापरा आणि फेकून द्या’ अशा वृत्तीचा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच गायकवाड याच्या कुकृत्यामुळे समाजात भाजपाचे नाक कापल्यामुळे ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. परंतु ‘मी नाही त्यातली आणि कडी.. आतली’ ही भाजपाची घाणेरडी वृत्ती असून जनतेला ती आता माहित झाल्याचे गोलेकर यांनी सांगितले. आरोपी गायकवाड हा आमचा नाही असे भाजपाने कितीही नाही म्हटले तरी तो भाजपचाच आहे हे जामखेडमधील लहान पोरांनाही माहित आहे. ‘बूँद से गई वो हौद से नहीं आती’, असे म्हटले जाते पण भाजपाची इज्जत आता हौदाने गेलीय, त्यामुळे आरोपी संदिप गायकवाड आमचा नाही, असे भाजपाने कितीही म्हटले तरी या घटनेने भाजपाचे जे नाक कापले गेले ते कदापि भरुन येणार नसल्याचा हल्लाही गोलेकर यांनी भाजपावर चढवला.
कोट
‘‘आमदार रोहितदादा पवार यांनी याप्रकरणी आवाज उठवला नसता तर हा गुन्हा दाबण्याचे प्रयत्न सुरु होते. आरोपी संदिप गायकवाड हा राष्ट्रवादीचा आहे, असे भाजपाचे म्हणणे असेल तर दिपाली पाटील हिने गुरुवारी आत्महत्या केली, परंतु गुन्हा दाखल होण्यासाठी २४ तासापेक्षाही अधिक काळ का लागला? हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न कुणी केला? सीसीटीव्ही फुटेज, लॉजमधील रजिस्टर गायब करण्याचा प्रयत्न कुणी केला? गुन्हा दाबण्यासाठी पोलिसांना फोन करुन कुणी दबाव आणला? या सगळ्याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. अशी चौकशी झाल्यास भाजपाला जामखेडकरांना तोंडही दाखवता येणार नाही.’’
- विजयसिंह गोलेकर (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार)











Comments