खर्डा ग्रामपंचायतीत गोंधळ; प्रोसिडिंग बुक गायब, सरपंचांवर गंभीर आरोप, ग्रामस्थांनी केली चौकशीची मागणी
- Police warrant
- Oct 30
- 1 min read

खर्डा प्रतिनिधी/30 ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका पार पाडताना केवळ काही मोजक्याच सदस्यांना अजिंठा दिला जात असल्याचे आणि उर्वरित सदस्यांना अजिंठ्याची माहितीही न देता बैठक घेऊन ठराव मंजूर केल्याचे समोर आले आहे.ग्रामस्थ व सदस्यांनी या संदर्भात आवाज उठवून प्रोसिडिंग बुक मागविले असता, ग्रामपंचायत कार्यालयात ते उपलब्ध नसल्याचे समोर आले.
ग्रामस्थांनी प्रोसिडिंग बुक गायब असल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. तक्रार मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी साहेबांनी विस्तार अधिकारी श्री. विसरवडे यांना प्रत्यक्ष तपासणीसाठी खर्डा येथे पाठवले.विस्तार अधिकारी विसरवडे यांनी खर्डा ग्रामपंचायतीत जाऊन तपासणी केली असता, ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक कार्यालयात उपलब्ध नसल्याचे आणि ते सरपंचांनी स्वतःजवळ म्हणजेच घरी नेल्याचे उघड झाले. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीचे सर्व नोंदी कार्यालयाबाहेर नेणे हा नियमबाह्य प्रकार मानला जातो.या तपासणीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य मदन पांडुरंग गोलेकर, प्रकाश गोलेकर, रंजना श्रीकांत लोखंडे, पुनम अशोक खटावकर, विकास शिंदे,सुनिता दीपक जावळे तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश ढगे, ग्रामस्थ आणि पत्रकार उपस्थित होते. या सगळ्या घटनेचा प्रत्यक्ष अहवाल तयार करून गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.ग्रामस्थांनी या प्रकाराच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, अशी ग्रामस्थ व सदस्यांची मागणी असून यानंतर पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











Comments