गॅस सिलेंडर रिफिलिंगचा काळा धंदा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तिघांना अटक व लाखोचा मुद्देमाल जप्त
- Police warrant
- Oct 30
- 2 min read

अहिल्यानगर | 30 ऑक्टोबर
घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून त्यातील गॅस व्यवसायिक टाक्यांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एकूण 33 लाख 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही महत्त्वाची कारवाई अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली केली.

दिनांक 29 ऑक्टोबर रोजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रविण नारायण खडके रा. चिचोंडी पाटील हा आपल्या घराजवळ घरगुती गॅस टाक्यांचा साठा करून त्यातील गॅस व्यवसायीक टाक्यांमध्ये भरत आहे आणि त्याद्वारे बेकायदेशीर विक्री करत आहे.त्यावर कृती करताना पोलीस निरीक्षक कबाडी यांनी उपनिरीक्षक अनंत सालुगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश लबडे, ह्रदय घोडके, बिरप्पा करमल, शामसुंदर जाधव, भिमराज खर्से, मनोज साखरे, महादेव भांड, उमाकांत गावडे यांचे पथक तयार केले आणि तातडीने घटनास्थळी रवाना केले.
पथकाने चिचोंडी पाटील येथे प्रविण खडके यांच्या घराजवळ धाड टाकली असता, लाल रंगाच्या गॅस टाक्या ठेवलेल्या ठिकाणी तीन इसम मिळून आढळले. त्यांच्या चौकशीत त्यांनी आपली नावे प्रविण नारायण खडके (वय 28, रा. चिचोंडी पाटील), वैभव आंबादास पवार (वय 47, रा. सांडवा) आणि गणेश पद्माकर भोसले (वय 37, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) अशी सांगितली.
सदर तिघांकडे परवाना नसून ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडरमधील एलपीजी गॅस व्यवसायिक टाक्यांमध्ये तसेच इतर वाहनांमध्ये भरत असल्याची कबुली त्यांनी दिली.
छाप्यात चार वाहने (किंमत 25,10,000 रुपये), भारत गॅस आणि एच.पी. गॅस कंपनीच्या 264 भरलेल्या आणि रिकाम्या गॅस टाक्या (किंमत 8,31,700 रुपये), गॅस भरण्याचे एक मशिन (किंमत 10,000 रुपये) आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा (किंमत 5,000 रुपये) असा एकूण 33,65,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शासकीय परवाना न घेता आणि ज्वलनशील वस्तूंच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता गॅस साठवून रिफिलिंग केल्यामुळे स्वतःचे व इतरांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता होती, असे पोलिसांनी नमूद केले आहे.या प्रकरणात आरोपींविरुद्ध बी.एन.एस. 2023 चे कलम 287, 288, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3, 7, एलपीजी (पुरवठा व वितरण नियमन) आदेश 2000 चे कलम 3(2)(b), गॅस सिलेंडर अधिनियम 2016 चे कलम 43, 45, 46 तसेच स्फोटक अधिनियम 1884 चे कलम 9(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक अनंत सालुगडे आणि पथकातील अंमलदारांनी केली. या प्रकरणी पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे











Comments