चिखल, खड्डे आणि गाळाचे साम्राज्य – जामखेड बसस्थानक प्रवाशांसाठी संकटस्थान! प्रवाशांचा संताप उफाळला
- Police warrant
- Nov 2
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी –2नोव्हेंबर2025
गेल्या पाच महिन्यांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे जामखेड बसस्थानकाची अवस्था बिकट झाली आहे. बसस्थानक परिसर पूर्णपणे चिखलमय झाला असून निचऱ्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसरात पाणी व गाळ साचून राहिला आहे. त्यामुळे प्रवाशी, चालक आणि बस कर्मचारी रोजच्या रोज चिखल आणि दुर्गंधीचा सामना करत आहेत.बसस्थानक परिसरातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, बसस्थानकात उभे राहण्यास प्रवाशांना जागा मिळणे अवघड झाले आहे. बसस्थानकातील नवीन इमारतीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना तात्पुरत्या जागेत बस पकडावी लागते. सततच्या चिखल आणि पाण्यामुळे बसमधून उतरतानाच नव्हे तर चढतानाही प्रवाशांचे कपडे व सामान चिखलाने माखतात. बसच्या चाकाखाली उडणारा चिखल अंगावर पडत असून, महिलांना व वृद्धांना विशेष त्रास होत आहे. तरीदेखील प्रवाशांना ही परिस्थिती मुकाटपणे सहन करावी लागत आहे.
दररोज शेकडो प्रवाशी विविध ठिकाणांवर प्रवासासाठी या बसस्थानकाचा वापर करतात. परंतु येथे योग्य स्वच्छतागृह, बसण्यासाठी बाके, वा पावसापासून संरक्षणाची पुरेशी सोय नाही. विशेषतः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे स्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. माहेरी जाणाऱ्या महिलांना चिखलातून वाट काढत बसपर्यंत जाण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि विद्यार्थ्यांनाही बसची वाट पाहताना त्रास सहन करावा लागत आहे.नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन, एमएसआरटीसी अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही. प्रवाशी संघटना केवळ नावापुरतीच अस्तित्वात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
जामखेड हे अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर या चार जिल्ह्यांच्या सीमारेषेवर असल्याने येथे विविध मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी दररोज मोठ्या प्रमाणात बसांचे आगमन व निर्गमन होते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी बसस्थानकाची अशी दयनीय अवस्था असणे ही प्रशासनाची मोठी निष्काळजीपणाची बाब आहे, असे नागरिकांचे मत आहे.सततच्या पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्याने बसना सुरळीतपणे फिरणे कठीण झाले आहे. चिखल, गाळ, आणि पाणथळीतून रोज मार्ग काढावा लागणं हे चालक आणि प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक झाले आहे, सुधारात्मक उपाय म्हणून लवकरात लवकर बसस्थानक परिसरातील निचऱ्याची व्यवस्था सुधारावी, चिखल काढण्यासाठी जेसीबी व सफाई यंत्रणा तैनात करावी, स्थानक परिसरात प्रकाशयोजना आणि तात्पुरते शेड उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांनी केली आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारादेखील प्रवाशांतून देण्यात आला आहे.











Comments