जामखेड तालुका हादरला; लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून चुलत मामाचा तरुणीवर विनयभंग, अॅसिड फेकण्याची धमकी सामाजिक कार्यकर्ते सागर टकले व ग्रामस्थांचा आरोपीला तात्काळ अटकेचा इशारा
- Police warrant
- Dec 9
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/9 डिसेंबर2025
जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथील १९ वर्षीय बीएस्सी प्रथम वर्षाची तरुणीवर विनयभंग व मारहाणीचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी तिच्याच चुलत मामाविरुद्ध जामखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी आई-वडील व भावासमवेत राहते असून आरोपी निखील रोहीदास हुलगुंडे (रा. चुंभळी, ता. जामखेड) हा ‘माझ्याशी लग्न कर’ असा सातत्याने दबाव आणत होता, तसेच १६ जुलै २०२५ रोजीही त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद आहे. तक्रारीनुसार, ८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुटुंबीय घरासमोर बसले असताना भावाच्या मोबाईलवर आरोपीचा फोन येऊन “तुझ्या बहिणीचे लग्न कुठे लावले, तर तुमच्या घरी येऊन गळफास घेईन” अशी आत्महत्येची धमकी देण्यात आली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून घरावर दगडफेक झाली; कुटुंबीय बाहेर येताच आरोपी निखील समोर आला आणि फिर्यादीच्या आईला “मुलीचे माझ्याशी लग्न होऊ दे, नाही तर तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकून विद्रूप करीन” अशी थरकाप उडवणारी धमकी दिली.
वादाच्या दरम्यान आरोपीने हातातील लाकडी काठीने आई प्रभावती यांच्या हात‑पायावर बेदम मारहाण केली. त्यानंतर ओट्यावर उभ्या असलेल्या तरुणीकडे जाऊन तिचा हात ओढत जवळ खेचून “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या घरासमोर फाशी घेईन” असे सांगत अंगलट करून विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला असून या संतापजनक प्रकारानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तिने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.
फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ७४, ३५२, ३५१(२) तसेच विनयभंग, धमकी व मारहाण या गंभीर कलमान्वये आरोपी निखील हुलगुंडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा, वैद्यकीय तपासणी आणि इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बटेवाडी व परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून सामाजिक कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सागर टकले यांनी ग्रामस्थांसह इशारा दिला आहे की आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अटक न झाल्यास पोलिस ठाण्याबाहेर उपोषण, धरणे व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सागर टकले व ग्रामस्थांनी दिल्याने पोलिस प्रशासनापुढे कारवाईचा तातडीचा प्रश्न उभा राहिला आहे.











Comments