पिकांची हमीभावाने खरेदीसाठी सोयाबीन व उडीद पिकांची ऑनलाइन नोंदणी सुरू; तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन – सभापती शरद (दादा) कार्ले
- Police warrant
- Nov 4
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/4नोव्हेंबर2025
महाराष्ट्रातील सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला असून शासनाचा पणन विभाग व नाफेड अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजना २०२५-२६ सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत जामखेड तालुक्याचे भुमिपुत्र लोकनेते विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जामखेड येथे तर चैतन्य कानिफनाथ कृषि व फळे प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. च्या वतीने खर्डा व नान्नज येथे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन व उडीद या पिकांची शासकीय हमीभावाने खरेदी होणार असून, आज दि. ४ नोव्हेंबर पासून ही ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ असून, सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले यांनी केले आहे.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती या केंद्राला नाफेड व पणन विभाग खरेदी केंद्र म्हणून मंजुरी मिळाली असून या खरेदी केंद्रात पिकांसाठी खालील प्रमाणे सोयाबीन ५३२८ रूपये प्रतिक्विंटल, उडीद ७८०० रूपये प्रतिक्विंटल हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. नोंदणीसाठी ७/१२ व ८अ उतारा (ई-पिक पाहणीसह), आधारकार्ड, बैंक पासबुक चालू खाते, जनधन खाते स्वीकारले जाणार नाही, शेतकऱ्याचे नाव सातबारावर असणे आवश्यक असून शेतकऱ्यांने स्वतः कागदपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर दि. १५ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार असल्याची माहिती जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद (दादा) कार्ले यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाने आपला शेतमाल विक्रीची संधी मिळत असल्याने त्यांना या अडचणीच्या परिस्थितीत दिलासा मिळणार आहे.











Comments