राजकीय सस्पेन्स कायम – जामखेड नगरपरिषदेच्या छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात; उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष
- Police warrant
- Nov 18
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/18नोव्हेंबर2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषद निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काल, सोमवार दि. १७ नोव्हेंबर रोजी संपली असून शेवटच्या दिवशी उमेदवार आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकृत करण्यात आले.या मुदतीपर्यंत एकूण किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या फॉर्मभरणीला उत्साहाचे वातावरण होते. शहरात ठिकठिकाणी समर्थकांचा जल्लोष, शक्तिप्रदर्शने निवडणुकीचे वातावरण तापले.सध्या उमेदवार यादी जाहीर झालेली नसून, विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत चर्चांना वेग आला असून, अधिकृत यादी केव्हाही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात सस्पेन्स कायम असून, राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्जांची छाननी आजपासून (१८ नोव्हेंबर) सुरू होणार आहे. छाननीनंतर माघारीची मुदत पूर्ण झाल्यावर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रचार मोहिमांचा वेग अधिक वाढेल, अशी अपेक्षा आहे.नगरपरिषदेसाठी मतदान २ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी काही दिवसांनी केली जाईल. एकूणच, जामखेड शहरात निवडणुकीची रंगत वाढली असून, उमेदवार व कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वांचे लक्ष आता अधिकृत उमेदवार याद्यांकडे लागले आहे.











Comments