साकत जिल्हा परिषद गटातून राजेंद्र पवार रणसज्ज — विकासमुखी दृष्टीकोनातून उमेदवारीची तयारी
- Police warrant
- Nov 14
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/14 नोव्हेंबर2025
नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा उत्साह वाढत असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या हालचालींना देखील वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील पाडळी गावचे रहिवासी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र साहेबराव पवार पाटील यांनी साकत जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची तयारी सुरू केली आहे.राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले की, आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याची संधी मिळाल्यास ते या निवडणुकीत सक्रियपणे सहभागी होतील. त्यांनी सांगितले की, “साकत जिल्हा परिषद गटाच्या जनतेने गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध सुविधा आणि विकासकामांची अपेक्षा केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हाच विकास सातत्याने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील.
राजेंद्र पवार हे नामांकित स्वातंत्र्यसैनिक आणि जामखेड तालुक्याचे वरिष्ठ नेते साहेबराव यादवराव पवार पाटील यांचे सुपुत्र आहेत. साहेबराव पवार पाटील यांनी 1962 साली जामखेड पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी 1962 ते 1978 या काळात जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासोबतच 1957 ते 1972 दरम्यान जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करत असताना त्यांना बँकेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.त्यांनी अनेक वर्षे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले. पवार पाटील यांनी बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला चालना दिली. त्यांच्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संधी मिळाली, तसेच शेतकरी वर्गासाठी विविध सहकारी उपक्रम उभे राहिले.
आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत राजेंद्र पवार गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) मध्ये सक्रीय आहेत. ते सध्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत असून पक्षाच्या संघटनात्मक रचनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक विकासात्मक कामांना गती दिली. यामध्ये साकत आणि सभोवतालच्या गावांमध्ये रस्त्यांचे काम, पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण, तसेच ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी हे प्रमुख प्रकल्प आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत त्यांनी पक्षाची भुमिका जनतेपर्यंत पोहोचवली आहे.पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा आणि वर्षानुवर्षे केलेली संघटनात्मक कामगिरी यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला दबदबा तयार झाला आहे. आ. रोहित पवार यांच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका घेतली होती. त्या काळात त्यांनी मतदारांना रोहित पवार यांची विकासदृष्टी आणि तालुक्यातील बदलाची गरज पटवून दिली होती.
राजेंद्र पवार यांनी सांगितले की, “साकत जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करण्याचा मानस आहे. या भागातील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत थेट सहभागी करणे हे माझे प्राथमिक ध्येय आहे.”आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव, पक्षाशी एकनिष्ठता आणि स्थानिक लोकांचा विश्वास हे त्यांच्या उमेदवारीचे प्रमुख बळ मानले जात आहे











Comments