हिवाळी अधिवेशनात वादळ;सूर्यकांत मोरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले चौकशीचे आदेश
- Police warrant
- Dec 9
- 1 min read

नागपूर प्रतिनिधी/९ डिसेंबर२०२५
नागपूर हिवाळी अधिवेशनात रोहित पवार उपस्थित कार्यक्रमातील एका व्हिडिओमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या जामखेड येथील सभेत विधान मंडळाच्या सभागृहाचा आणि सभापतींचा अपमान झाल्याचा आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून हक्कभंगाचा मुद्दा जोरात पुढे आला आहे.
दि.२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या जामखेड नगरपरिषदेच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि सभागृहाबद्दल आक्षेपार्ह भाष्य केले, असा आरोप भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केला. दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडत, लोकशाहीच्या मंदिर मानल्या जाणाऱ्या विधिमंडळाचा अपमान सहन केला जाणार नाही असे सांगितले आणि या वक्तव्यामुळे वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा धुळीस मिळाल्याचे नमूद केले.
सदर सभेत सूर्यकांत मोरे यांच्या सोबत आमदार रोहित पवार देखील मंचावर उपस्थित असल्याने त्यांचीही नैतिक जबाबदारी निश्चित होते, असे दरेकर यांनी अधिवेशनात स्पष्ट केले. अपमानास्पद वक्तव्य होतानाही रोहित पवार यांनी आक्षेप न घेतल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, असा त्यांचा आग्रह आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे
हक्कभंग प्रस्ताव मांडल्यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्राथमिक निर्णय देताना हे प्रकरण तपासण्यासाठी पोलिसांना सूचना देण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी चौकशी करून गुन्हा नोंदवायचा की नाही, याबाबत अहवाल द्यावा, असे त्या म्हणाल्या. यानंतर हा विषय विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे संदर्भित केला जाणार असून तेथून पुढील कार्यवाही निश्चित होईल.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरदरम्यान नागपूर येथे सुरू आहे. केवळ सात दिवसांचे असले तरी शनिवार आणि रविवारसह सलग बैठका होत असल्याने हे अधिवेशन हॉट सीट बनले आहे. हक्कभंगाचा हा मुद्दा पुढील काही दिवसांतील चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील घमासान आणखी वाढण्याची शक्यता आहे.











Comments